नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित विविध ठिकाणाचा विकास अथवा नूतनीकरण करण्याच्या विविध कामांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने आणखी २८ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सरकारने या विविध कामांची घोषणा याआधीच केली होती. त्यात हा अतिरिक्त निधी सामाजिक न्यायमंत्री थावरसिंग गेहलोत यांनी मंजूर केला असल्याचे बुधवारी एका अधिकृत पत्रकात म्हटले आहे.यापैकी ९.४१ कोटी रुपयांचा जादा निधी नागपूर येथील दीक्षाभूमीच्या नूतनीकरणासाठी देण्यात आला आहे. हे काम लवकर सुरू व पूर्ण व्हावे यासाठी यापैकी निम्मी रक्कम नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याआधीच सुपुर्द करण्यात आली आहे.मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार याखेरीज डॉ. आंबेडकर यांच्याशी संबंधित महाड येथील ठिकाणांच्या विकासासाठी २.३६ कोटी रुपये तर चिंचोली येथील ठिकाणांसाठी १७.०३ कोटी रुपयांचा जादा निधी देण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दीक्षाभूमीच्या कामासाठी आणखी ९ कोटी
By admin | Updated: June 30, 2016 04:01 IST