भोपाळ : आफ्रिका खंडातील बोत्स्वाना या देशातून आठ चित्ते दोन टप्प्यांत भारतात आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात मे महिन्यापर्यंत चार चित्ते भारतात पोहोचणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य प्रदेश सरकारने एका पत्रकात म्हटले आहे की, भोपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या ‘प्रोजेक्ट चित्ता’च्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली.
या बैठकीस केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि केनियामधून आणखी चित्ते भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चित्ता प्रकल्पावर आतापर्यंत ११२ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे, त्यापैकी ६७ टक्के निधी मध्य प्रदेशातील चित्ता पुनर्वसनासाठी वापरण्यात आला अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
असे आले चित्ते भारतात
१७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबियातून पाच मादी आणि तीन नर अशा आठ चित्त्यांचे कुनो राष्ट्रीय उद्यानात आगमन झाले.
चित्त्यांची ही पहिलीच आंतरखंडीय स्थलांतर मोहीम होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेहून आणखी १२ चित्ते तिथे आणण्यात आले.
सध्या कुनो राष्ट्रीय उद्यानात २६ चित्ते असून, त्यात १४ भारतात जन्मलेली पिल्ली आहेत.
गांधीसागर अभयारण्यात चित्त्यांचे पुनर्वसन
गांधीसागर अभयारण्य राजस्थानच्या सीमेवर असल्यामुळे, मध्य प्रदेश व राजस्थान सरकारदरम्यान आंतरराज्य चित्ता संवर्धन क्षेत्र स्थापन करण्यावर तत्त्वतः सहमती झाली आहे.