ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - २०१४ लोकसभा निवडणूक हा देशातील क्रांतीकारी बदल असून २०२० पर्यंत भारत हिंदूराष्ट्र होईल असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी व्यक्त केला आहे. २०३० पर्यंत संपूर्ण जगच हिंदू होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक के. सुदर्शन यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिल्लीत झाले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, विहिंपचे नेते अशोक सिंघ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सिंघल म्हणाले, मी साई बाबांच्या आश्रमात गेलो होतो त्यावेळी साईबाबांनी मला सांगितले होते २०२० मध्ये भारत हिंदूराष्ट्र होईल. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीने फक्त भारतातच नव्हे तर जगाला नवीन विचारधारा दिली आहे असेही सिंघल यांनी नमूद केले. सिंघल यांनी पुन्हा हिंदू राष्ट्रासंदर्भात विधान केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.