ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. १५ - आवडते बूट व कपडे खराब केल्याच्या रागातून बेंगळुरु येथे १६ वर्षाच्या मुलाने त्याच्या तीन वर्षाच्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत त्या चिमुरड्याचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.
बेंगळुरुत राहणारे रवि हे इलेक्ट्रीकल्सच्या व्यवसायात असूत पत्नी शिवमा व दोन लहान मुल असा त्यांचा कुटुंब आहे. रवि यांचे अन्य नातेवाईकही बेंगळुरुतच स्थायिक झाले असून सोमवारी रवि यांचे चुलत बंधू त्याच्या घरी आले होते. परतत असताना त्यांनी रवि यांचा तीन वर्षांचा मुलगा प्रितमलाही सोबत नेले. चुलत भावाचा मोठा मुलगा हा १६ वर्षांचा असून तो एका हॉटेलमध्ये काम करत होता. प्रितमने त्याच्या भावाचे कपडे व बूट खराब केले होते. या रागातून त्या अल्पवयीन मुलाने प्रितमला काठीने बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार प्रितमच्या मोठ्या बहिणीने बघितला व तिने घरी आईवडिलांना या मारहाणीची तक्रारही केली होती. प्रितम घरी परतल्यावर काही वेळाने त्याची प्रकृती खालावली. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान प्रितमचा मृत्यू झाला. याप्रकरणी रवि यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली.