१४... मौदा... चोरी
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये पळविले
१४... मौदा... चोरी
सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये पळविलेमौद्यात भरदिवसा चोरी : मारहाण करून जखमी केलेमौदा : चोरट्यांनी भरदिवसा घरात शिरून फिर्यादीस मारहाण करीत गंभीर जखमी केले. शिवाय, घरातील २५ हजार रुपये रोख व ३० तोळे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. ही घटना मौदा शहरातील लापका मार्गावर शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी टंटू महादेव हटवार (७०, रा. लापका रोड, मौदा) यांच्या घरी सलून व इतर दोन दुकाने आहेत. त्यांना दोन मुले व दोन मुली असून, मुले व मुली मुंबईला वास्तव्याला आहेत. त्यांची पत्नीही काही दिवसांपूर्वी मुलाकडे काही कामानिमित्त मुंबईला गेली होती. त्यामुळे ते घरी एकटेच होते. दरम्यान, शनिवारी दुपारी तीन अनोळखी तरुणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. सुरुवातीला त्या तरुणांनी रूम किरायाने मिळेल का, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. काही वेळातच त्या तरुणांनी त्यांना ढकलत किचनपर्यंत नेले. त्यानंतर त्यांनी चाकू दाखवीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, सोन्याच्या आठ अंगठ्या आणि २५ हजार रुपये रोख एवढा ऐवज हिसकावून घेत पळ काढला. तत्पूर्वी त्यांना जखमी करण्यात आले. सदर चोरटे आपसांत हिंदीत संभाषण करीत असून, ते लापका रोडने पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच मौदा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टंटू हटवार यांना सुरुवातीला मौदा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरला रवाना करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, मौद्याचे ठाणेदार बी. एम. गायगोले आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***