१३३ अपंग विद्यार्थ्याना साहित्य वाटप करणार
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
महापालिका : साहित्य साधने व उपकरणे मोजमाप शिबिर
१३३ अपंग विद्यार्थ्याना साहित्य वाटप करणार
महापालिका : साहित्य साधने व उपकरणे मोजमाप शिबिरनागपूर : अपंग मुलांना सर्वसामान्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व शिक्षा अभियान, अपंग समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत साहित्य- साधने व उपकरणे वाटप करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे यशवंत स्टेडियम येथील क्रीडा प्रबोधनी येथे साहित्य -साधने व उपकरणे मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोजमाप घेण्यात आलेल्या मुलांना लवकरच साहित्याचे वाटप केले जाणार आहे. यावेळी शिक्षण सभापती गोपाल बोहरे, शिक्षणाधिकारी अशोक टालाटुले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मतिमंद, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, कर्णबधिर व दृष्टिदोष असे अपंगत्व असलेल्या मुलांमध्ये दोष आढळून येतात. काहींना चालता येत नाही. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य होण्याची शक्यता असते. त्यांच्या शालेय सहभागात कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी येऊ नये. यासाठी त्यांच्या गरजेनुसार साहित्य वाटप करणे गरजेचे असल्याने तज्ज्ञामार्फत त्यांचे मोजमाप घेण्यात आले. मोजमाप घेण्यात आलेल्या मुलांना पुढील तीन महिन्यात साहित्य वाटप केले जाणार आहे. यावर ५ लाखाचा खर्च अपेक्षित असून सर्व शिक्षा अभियानातून तो केला जाणार आहे. (प्रतिनिधी)