रायपूर : छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी सकाळी केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) १३ कर्मचारी ठार, तर तेवढेच गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षी नक्षलवादी हल्ल्यात झालेली सीआरपीएफची ही सर्वाधिक प्राणहानी आहे.येथे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर नक्षलवादी व सुरक्षा दल यांच्यातील धुमश्चक्री सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या चकमकीत काही नक्षलवादीही मृत वा जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांचा आकडा लगेच समजू शकला नाही.सूत्रांनुसार दक्षिण बस्तर भागात येणाऱ्या सुकमा जिल्ह्यातील कसानपाडा परिसरात गेले १० दिवस सीआरपीएफची ‘एरिया डॉमिनन्स’ (क्षेत्र प्रभुत्व) मोहीम सुरू होती. ती मोहीम उरकून सीआरपीएफच्या २२३ बटालियनची सुमारे १२० जवानांची तुकडी परतत असता चिंतागुंफाजवळ एलमागुंडा व एरागोंडादरम्यान सकाळी १०.३० च्या सुमारास हा हल्ला झाला. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांच्या परतीच्या मार्गावर आधीपासूनच सुरुंग पेरून ठेवले होते. त्या सुरुंगांचा स्फोट होताच आसपासच्या जंगलात लपून बसलेल्या नक्षलींनी सीआरपीएफच्या तुकडीवर चहुबाजूंनी गोळीबार सुरू केला. >माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे १३ अधिकारी व जवान शहीद झाल्याच्या वृत्ताने अतीव दु:ख झाले व मन व्यथित झाले. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले.
नक्षली हल्ल्यात १३ जवान शहीद
By admin | Updated: December 2, 2014 09:06 IST