लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या २०१७ साली होणाऱ्या निवडणुकांपूर्वी सरकारची जनमानसातील प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नांतर्गत अखिलेश यादव सरकारच्या मंत्रिमंडळात शनिवारी व्यापक फेरबदलासह २० मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या विस्तारात आठ मंत्र्यांना पदोन्नती मिळाली असून १२ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.राज्यपाल राम नाईक यांनी राजभवनात आयोजित समारंभात पाच कॅबिनेट, आठ स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि सात राज्यमंत्र्यांना शपथ दिली. नव्या मंत्रिमंडळात बलवंतसिंग रामूवालिया यांची वर्णी लागणे आश्चर्यकारक मानले जात आहे. पंजाबमधील सत्ताधारी अकाली दलातून बाहेर पडून त्यांनी उत्तर प्रदेशचे मंत्रिपद स्वीकारले आहे. ते राज्य विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. समाजवादी पार्टी सत्तारूढ झाल्यापासूनचा मंत्रिमंडळातील हा सहावा फेरबदल आहे. (वृत्तसंस्था)---------------राज्यपालांनी राष्ट्रगीत मध्येच थांबविल्याने वादउत्तर प्रदेशात नव्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभादरम्यान राज्यपाल राम नाईक यांनी बॅण्डवर सुरू झालेले राष्ट्रगीत मध्येच थांबविल्याने वाद निर्माण झाला आहे. शपथविधी समारंभानंतर राष्ट्रगीताची परंपरा आहे. आजही तेच झाले; परंतु नियोजित कार्यक्रमानुसार शपथविधीनंतर राज्यपालांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ द्यायची होती. त्यानंतर राष्ट्रगीत होणार होते. शपथविधी होताच राष्ट्रगीत सुरू झाले. तेव्हा राज्यपालांनी इशाऱ्याने समोर उभ्या असलेल्या लोकांना बसण्यास सांगितले. बहुधा त्यांना तत्पूर्वी शपथ द्यायची होती. त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाईक यांचा हात पकडला. राष्ट्रगीत सुरू झाले आहे ते मध्ये थांबवू नका असे त्यांना सुचवायचे होते. या संभ्रमातच राज्यपाल राष्ट्रगीत थांबवू इच्छितात असा संदेश बॅण्ड पथकापर्यंत पोहोचला आणि राष्ट्रगीत बंद झाले. राज्यपालांनी उपस्थितांना शपथ दिली आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रगीत सुरू झाले. राज्यपालांच्या या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे गैरसमजातून हा प्रकार घडला असून राष्ट्रगीताचा अपमान करण्याचा हेतू यामागे नव्हता, असा खुलासा राजभवनातील एका अधिकाऱ्याने केला.