कोची : मंगलोरला जाणाऱ्या मालाबार एक्स्प्रेसचा कोचीपासून ४५ किमी अंतरावर अपघात झाला. या रेल्वेचे १२ डबे रुळावरुन घसरले. पण, सुदैवाने यातील कुणालाही मोठी दुखापत झाली नाही. या अपघाताने या मार्गावरील रेल्वे सेवा मात्र विस्कळीत झाली. रविवारी पहाटे ३च्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, एर्नाकुलमला जाणाऱ्या चेन्नई-त्रिवेंद्रम या रेल्वेला वेळेवरच अलर्ट मिळाल्याने ही रेल्वे अपघातस्थळापासून ३०० मीटर अंतरावर रोखण्यात आली. एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना कारुकुट्टीजवळ हा अपघात झाला. एक संभाव्य टक्कर होता-होता टळली. दक्षिण रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक पी.के. मिश्रा हे तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी सांगितले की, एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. हे डबे रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेपासून वेगळे झाले नाहीत तसेच उलटलेही नाहीत. त्यामुळे यातील प्रवासी सुखरूप राहिले. तर या अपघातामुळे या मार्गावरील २१ रेल्वे रद्द करण्यात आल्या. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रुळांत काही दोष असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)
रेल्वेचे १२ डबे रुळावरून घसरले
By admin | Updated: August 29, 2016 02:38 IST