नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील जायगाव येथील मोठ्या पाझर तलावाला तडे गेल्याची माहिती संबंधित विभागास कळवूनही त्याची कुठलीही दखल संबंधित विभागाने घेतली नसल्याने परिसरातील शेतकऱ्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.नायगाव खोऱ्याला वरदान ठरत असलेल्या जायगाव येथील मोठ्या पाझर तलावाच्या मातीच्या भरावास अनेक तडे गेले आहेत. याबाबत परिसरातील शेतकरी व जायगाव ग्रामपंचायत प्रशासनाने सिन्नर तहसील कार्यालय आणि लघु पाटबंधारे विभागास कळविले होते. २ आॅगस्टपासून सदर तड्यांतील वाढ होत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. लघु पाटबंधारे विभागाचे प्रभारी उपअभियंता एन. पी. देशमुख यांनी सदर तड्यांची पाहणी करून तड्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. तड्यांवर मुरूम टाकून तात्पुरती उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी जायगाव ग्रामपंचायतीस दिल्या होत्या. ग्रामपंचायत प्रशासनाने पुन्हा सिन्नर तहसील कार्यालयास तड्यांबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली असली तरी सदर तड्यांवर ग्रामपंचायतीनेही अद्याप मुरुम टाकलेला नाही. (वार्ताहर)
जायगाव पाझर तलावाला तडे
By admin | Updated: August 12, 2016 22:28 IST