नाशिक : ऐ मेरे वतन के लोगो..., मेरा रंग दे बसंती चोला..., ये देश हैं वीर जवानों का... अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमला. निमित्त होते, ‘युवा स्वतंत्रता ज्योत फेरी’चे. या फेरीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्टभक्तीचा शहरात जागर केला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूररोडवरील हुतात्मा चौकातून संध्याकाळी ७ वाजता फेरीला सुरुवात करण्यात आली. या या फेरीमध्ये सहभागी युवक-युवती डोक्यावर गांधी टोपी परिधान करून हातात मशाल घेत संचलन करत होते. फेरीमध्ये बग्गीत भारतमातेच्या वेशभूषेत बसलेल्या महिलेने लक्ष वेधले. अग्रभागी हातात राष्टÑध्वज घेतलेले युवक होते. यावेळी भारत माता की जय..., हिंदुस्थान जिंदाबाद..., वंदे मातरम्... अशा देशभक्तीपर घोषणा देत परिसर दणाणून सोडला. फेरी गंगापूररोडने मॅरेथॉन चौकातून अशोकस्तंभ, मेहेर चौक, एम.जी.रोडने छत्रपती शिवाजी स्टेडियमधून हुतात्मा स्मारकात पोहचली. येथे सर्व सहभागी नागरिकांनी हुतात्म्यांना अभिवादन करत भारतमातेचा जयजयकार केला. नागरिकांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढीस लागावा या उद्देशाने फेरी काढली जाते, असे विश्वास ठाकूर यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्या वतीने ‘युवा स्वतंत्रता ज्योत’ फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:02 IST