नाशिक : किरकोळ कारणावरून झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशाल बाळू साळवे (२२) असे मयत युवकाचे नाव असून, शनिवारी सायंकाळी इंदिरानगर परिसरातील रंगरेज मळा परिसरात सदर घटना घडली. या घटनेतील चारही संशयितांना इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.वडाळागाव राजवाडा परिसरातील तलाठी कार्यालयाजवळ राहणारा विशाल साळवे हा साळवे मळा भागात त्याच्या काकांकडे गेला होता. रात्री सात वाजेच्या सुमारास चुलत भाऊ व तेथील तरुणांच्या टोळक्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. विशाल हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता टोळक्यामधील एकाने पाठीमागून येऊन त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी युवकाला रुग्णालयात हलविले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.पोलीस उपआयुक्त विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त हेमराजसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या शोध पथकाने धिरेंद्र उर्फ धिरज सुरेश शर्मा (२०), रवि शिवशंकर शर्मा (२०), राहुल संजय विश्वकर्मा (२०) (सर्व राहणार भय्यावाडी, रंगरेज मळा, इंदिरानगर) प्रवीण रामकिसन शर्मा (२२, रा. पाथर्डी) या चारही संशयितांना मध्यरात्री ताब्यात घेतले. पुढील तपास राठोड करीत आहे. विशाल हा एका खासगी ठिकाणी नोकरी करीत होता. (प्रतिनिधी)
भांडण सोडविण्यास गेलेल्या युवकाचा वडाळागावात खून
By admin | Updated: January 18, 2015 23:17 IST