नाशिक : उड्डाणपुलावरून द्वारकेच्या दिशेने जाणाऱ्या कारला भाभानगरच्या दरम्यान अपघात झाल्याने कार उलटली. या अपघातात जेलरोड येथील एक युवक जागीच ठार झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईकडून उड्डाणपुलावरून येणारी मारुती अल्टो कार (एमएच १५ सीएम ५८९४) मुंबई नाक्यापासून काही अंतर कापून भाभानगरपर्यंत आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार उड्डाणपुलावरील दुभाजकावर जाऊन आदळून कोलांटउड्या मारून उलटली. या अपघातात जेलरोडवरील मॉडेल कॉलनीमध्ये राहणारा सौरभ शंकर आव्हाड (१८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोघे मित्र गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींची नावे समजू शकली नाहीत. हे तिघे मित्र मुंबई येथून घरी परतत होते. त्यांच्यापैकी एक युवक कार चालवित होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळल्याचे भद्रकाली पोलिसांनी सांगितले. उड्डाणपुलावर तुफान वेगाने वाहने हाकली जातात. यामुळे यापूर्वीही काही अपघात घडले असून, प्राणहानीही झाली आहे. उड्डाणपुलावर वाहतूक पोलिसांची नेमणूक केल्यास वेगावर नियंत्रण राहू शकेल.याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ हा सेंट फिलोमिना शाळेचा विद्यार्थी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, भाऊ, बहीण, काका, काकू असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
उड्डाणपुलावर कार उलटल्याने युवक ठार
By admin | Updated: November 23, 2015 23:49 IST