नाशिक : प्रभागरचना व आरक्षण सोडतीनंतर महापालिका निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरू झाली असून, राजकीय पक्ष-संघटना स्तरावर युती-आघाडीची चर्चा सुरू असतानाच जास्तीत तरुणांनी महापालिका निवडणूक लढवावी यासाठी नाशिक महानगर युवा आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीमार्फत तरुणाईला राजकारणात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.निवडणूक जाहीर झाली की वेगवेगळ्या स्तरावर आघाडी स्थापन होण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी गैरराजकीय आघाडी होण्याचे प्रकार नवीन नाहीत. यापूर्वी शहर विकास आघाडी, विकास मंच या नावाने प्रयोग झालेही आहेत. आता महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असतानाच युवकांचा राजकारणात सक्रिय सहभाग वाढावा आणि जास्तीत जास्त युवकांनी निवडणूक लढवावी यासाठी ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनी शहरातील काही युवकांनी एकत्र येत नाशिक महानगर युवा आघाडीची स्थापना केली आहे. शहरातील तरुणांचा प्रस्थापित पक्षांनी चालविलेला गैरवापर आणि त्यामाध्यमातून वाढलेली गुन्हेगारी यामुळे तरुणाईचा राजकारणाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे. या परिस्थितीत बदल होऊन युवकांचा राजकारणात सक्रिय सहभाग वाढावा याकरिता युवा आघाडीच्या माध्यमातून राजकीय चळवळ सुरू करण्यात आल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. तरुणांचा राजकारणात सक्रिय सहभाग, भ्रष्टाचारमुक्त शहर, सुरक्षित व गुन्हेगारीमुक्त शहर, घराणेशाहीला विरोध, तरुणांसाठी राजकीय प्रशिक्षण, शिक्षणाचे बाजारीकरण रोखणे, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी व स्वच्छ-सुंदर नाशिक हा या चळवळीचा उद्देश आहे. युवा आघाडीने जास्तीत युवकांना निवडणूक लढविण्याचेही आवाहन केले असून, सभासद नोंदणीसाठी हेल्पलाइनही कार्यान्वित केली आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीसाठी तरुणाईला साद
By admin | Updated: October 22, 2016 01:36 IST