नाशिक : रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या बहिणीला मुंबईनाका येथील महामार्ग बसस्थानकावर सोडण्यास आलेल्या भावाच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून अज्ञात चोरट्यांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली.याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंदन कैलास कुमावत (२७, रा. कामटवाडे) हा युवक रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास महामार्ग बसस्थानकात आपल्या बहिणीला बसमध्ये बसवून देण्यासाठी आला होता. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी कुंदन यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. याप्रकरणी कुमावत यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.सणासुदीचे दिवस असल्याने चोरट्यांनी बसस्थानकांवर वक्रदृष्टी केली आहे. पोलिसांनी बसस्थानकांच्या परिसरात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. चोरट्यांकडून गर्दीचा फायदा घेत महिला, पुरुषांची लूट बसस्थानकांवर केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
युवकाची सोनसाखळी ओरबाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:28 IST