नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गोदाकाठलगतचा मखमलाबाद-आनंदवली जोडरस्ता पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट झाल्याने तरुणाईचा उन्माद या रस्त्यावर पुन्हा दिसू लागला आहे.मद्यधुंद होऊन रविवारी (दि.११) संध्याकाळी पावसात भिजत तरुणांनी या रस्त्यावर बेभान होऊन उन्माद केला. शिव्यांची लाखोली वाहून दुचाकी वेगात नेऊन रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फेकून ‘रोड-शो’ केला. संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी नदीकाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी तरुणाईच्या उन्मादावर तीव्र नाराजी दर्शविली. तरुण-तरुणी भरधाव वेगाने दुचाकी-चारचाकी दामटवित होते, तर काहींनी रस्त्याच्या कडेला चारचाकी उभ्या करून साउंड सिस्टिमचा दणदणाट करून धूम्रपान-मद्यपान करत नाचण्याचा प्रतापही केला. तरुणाईच्या वाढत्या उन्मादाने जेरीस आलेल्या काही जागरूक नागरिकांनी यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता ‘आता तो रस्ता आमच्या हद्दीत राहिलेला नाही’ असे उत्तर कानी पडल्याचे काही ज्येष्ठांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना पंचवटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. एकीकडे व्हॉट्सअॅप सेवेच्या माध्यमातून पोलीस जनतेच्या जवळ जाण्याचा व सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे जनतेच्या तक्रारींना ‘हद्दी’च्या वादात टोलविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आल्याने काहींनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, एका उच्चाधिकाऱ्यांची मोटारही या रस्त्यावरून थेट आनंदवलीकडे मार्गस्थ झाली, तरीदेखील त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला नाही हे विशेष! पोलिसांच्या निळ्या दिव्याची मोटार येत असल्याचे बघून बेभान तरुणांनी काही मिनिटे भानावर आल्याचे भासविण्याचा प्रयत्नही केला. एकूणच हद्द बदलल्याचा लाभ बेभानपणे उन्माद करणाऱ्या तरुणांना होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
गोदाकाठच्या रस्त्यावर तरुणाईचा पुन्हा उन्माद
By admin | Updated: October 11, 2015 23:31 IST