त्र्यंबकेश्वर : यावर्षी त्र्यंबकेश्वर शहरात पिण्याच्या पाण्याची स्थिती उत्तम असून, यंदाच्या वर्षी शहरात पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी व्यक्त केला आहे. त्र्यंबकेश्वरमधील जलाशय दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच आटू लागतात; यावर्षी फेब्रुवारी अखेरही तीनही जलाशयात पाण्याचा भरपूर साठा असल्याचे दिसून येते. अहल्या धरण, अंबोली धरण व गौतमी-गोदावरी प्रकल्पातील त्र्यंबकेश्वर शहरासाठी राखून ठेवलेला पाणीसाठा भरपूर असल्याने पाणीटंचाई भासणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लढ्ढा यांनी अहल्या धरणाची खोली वाढविण्याचे काम हाती घेतले असून, नगरसेवकांनीही यात सहभाग नोंदविला आहे. पावसाळ्यात परिसरातील डोंगरांवरून वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर दगड, माती, कचरा धरणपात्रात येऊ नये म्हणून धरणापासून काही अंतरावर बांध घातले गेल्याने मागील वर्षी धरणातील पाणी स्वच्छ होते. मागील वर्षी पावसाचे प्रमाणदेखील जास्त होते. मागील आॅगस्ट महिन्यात सतत २/३ दिवस झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील सर्व जलाशय ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे यंदा पाण्याची स्थिती उत्तम आहे. बेझे धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग होत असून, याबाबत बेझेवासियांचीदेखील तक्र ार आहे. तथापि, संबंधित शाखा अभियंत्याच्या म्हणण्यानुसार त्र्यंबकेश्वरसाठी पाणी कमी पडणार नाही. शहराला यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असे म्हटले जात असले तरी खासगी व बेकायदा मोटारी लावून बेसुमार पाणी उपसा होत राहिला तर पाणीटंचाई नक्की भासणार आहे. शासनाने बेकायदा पाणी उपशाला पायबंद घालावा, अंबोली धरण ते त्र्यंबकेश्वर पाणीपुरवठा केंद्रापर्यंत लावण्यात आलेल्या एअर व्हॉल्हमधून होणारी गळती थांबवावी, पाणीबचतीसाठी नगराध्यक्ष विजया लढ्ढा, मुख्याधिकारी चेतना मानुरे केरु रे व पाणीपुरवठा सभापती यांनी आतापासूनच लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)