त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद बुधवारी (दि. २१) शहर व परिसरात शांततेत साजरी झाली. रमजान ईदप्रमाणे या ईदचाही विशेष नमाजपठणाचा सामूहिक सोहळा शहाजहांनी इदगाह मैदानावर कोरोनाच्या निर्बंधामुळे होऊ शकला नाही, तसेच मशिदींमध्येही गर्दी उसळू नये, यासाठी सामूहिक नमाजपठणावर निर्बंध घालण्यात आले होते. पहाटेपासूनच शहरासह उपनगरांमध्येही मशिदींभोवती पोलिसांचा कडा पहारा रात्रीपर्यंत पाहावयास मिळाला. मध्यरात्रीपासून पावसाची संततधारही सुरू झाल्याने मुस्लीमबहुल भागांमध्ये ईदची एरवी दिसणारी ‘रौनक’ फिकी पडल्याचे जाणवत होते. हस्तांदोलन, आलिंगन, गुलाबपुष्प देत एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देतानाही अपवादानेच नागरिक दिसून आले. दरम्यान, सकाळी ७ वाजता विविध मशिदींतून धर्मगुरूंनी ध्वनिक्षेपकांद्वारे ‘ईद’ निमित्त समाजबांधवांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला, तसेच सरकारच्या सर्व सूचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले. जुने नाशिक, वडाळागाव, नाशिक रोड, देवळाली गाव, विहितगाव, देवळाली कॅम्प, सातपूर आदी मुस्लीमबहुल परिसरात ईदनिमित्त रेलचेल अन् उत्साहाचे वातावरण अल्पशा प्रमाणात दिसून आले. शुभेच्छा संदेशासाठी पुन्हा एकदा सोशल मीडियाचा वापर तरुणाईकडून अधिकाधिक केला गेला.
--इन्फो--
लगबग अन् रौनक हरविली; इदगाह ओस
एरवी ईद म्हटली की, सकाळपासूनच समाजबांधवांची इदगाह मैदानावर हजेरी लावण्यासाठीची लगबग सुरू झालेली पाहावयास मिळायची. सर्व समाजबांधव शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर एकत्र येत शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करत, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दुआ मागताना दिसून येत असे. हा शाही सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा असायचा. मात्र, मागील दोन वर्षांपासून आलेल्या कोरोनाच्या साथीने हे सर्व जणू इतिहासजमाच केले आहे. सलग दुसऱ्यांदा रमजान ईदनंतर बकरी ईदच्या दिवशीही इदगाह मैदान ओस पडलेले पाहावयास मिळाले.
210721\21nsk_25_21072021_13.jpg
ईदगाह मैदानावर शुकशुकाट