सातपूर : सातपूर प्रभागातील अधिकारी सर्वसामान्यांचेच काय नगरसेवकांचेदेखील ऐकत नसल्याने संतप्त नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांविषयी हतबल होऊन बोलताना सभापतींनाच अश्रू अनावर झाले; मात्र ढिम्म अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. प्रभागातील अधिकारी स्वत:हून कोणतीही कामे करीत नाहीतच शिवाय नगरसेवकांनी सांगितलेली कामेदेखील करीत नसल्याने अशा अधिकाऱ्यांच्या जागेवर सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी संतप्त मागणी नगरसेवकांनी प्रभाग सभेत मांडली. सातपूर प्रभाग सभापती उषा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग सभा घेण्यात आली. विभागातील अधिकाऱ्यांकडून जी तत्परता अपेक्षित आहे तसे कामकाज त्यांच्याकडून होत नसल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. अधिकाऱ्यांविषयी नाकर्तेपणाचा पाढा वाचला जात असताना सभापती शेळके यांनीही अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांविषयी रडगाणे आणि सभापतींना अश्रू
By admin | Updated: July 11, 2015 00:21 IST