सिन्नर : तालुक्यातील खंबाळे शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, बिबट्याच्या हल्ल्यात वनपाल जखमी झाल्याची घटना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. खंबाळे येथे गुरुवारी रात्रीपासून बिबट्याने मुक्काम ठोकला आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने शिवाजी आंधळे यांची बकरी फस्त केल्याची घटना घडली. शुक्रवारी पहाटे दौलत सीताराम सांगळे हे शौचासाठी बाहेर जात असतांना त्यांना गवतात लपलेला बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड करीत ग्रामस्थांना जागे केले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांच्यासह सुमारे १० वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सकाळी सात वाजेपासून बिबट्या एका शेतातून दुसऱ्या शेतात मुक्तपणे फिरत होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सदर वार्ता परिसरात पसरल्यानंतर शेतकरी व बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बघ्यांना विनंती करुन माघारी धाडले.वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके, पी. एस. सरोदे, अनिल साळवे, चंद्रकांत आव्हाड यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे दहा तास या परिसरात गस्त केली. बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी त्यांनी तयारी केली होती. मात्र बिबट्याने गुंगारा देत सर्वांचीच दमधाक केली. सायंकाळी उशीरा वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याचे काम सुरु केले होते. (वार्ताहर)
बिबट्याच्या हल्ल्यात वनपाल जखमी
By admin | Updated: July 30, 2016 01:12 IST