लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : कंपनीतील सहकाऱ्यांच्या जाचास कंटाळून कामगाराने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़ २८) दुपारच्या सुमारास घडली़ अशोक बाबूराव चव्हाण (३८,अली बाबा मळा, पॉवर हाउस, अंबड, मूळ राहणार साक्री, जि़ धुळे) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे़ दरम्यान, चव्हाण यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कंपनीतील सात ते आठ कर्मचारी त्रास देत असल्याचे नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अली बाबा मळ्यातील रहिवासी अशोक बाबूराव चव्हाण हे अंबड औद्योगिक वसाहतीतील मेट्रो पॉलिमर्स या कंपनीत कामास होते़ कंपनीतील त्यांचे सात ते आठ सहकारी त्यांना मानसिक त्रास देत असत़ यामुळे त्रस्त झालेल्या चव्हाण यांनी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़दरम्यान, अंबड पोलीस ठाण्यात अशोक चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे़ चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी अंबड पोलिसांनी ताब्यात घेतली असून, या चिठ्ठीत नावे असलेल्या इसमांचा शोध सुरू आहे़ तर चिठ्ठीत नावे असलेल्या इसमांची चौकशी केल्यानंतर त्यातून येणाऱ्या माहितीनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़
सहकाऱ्यांच्या जाचास कंटाळून कामगाराची आत्महत्या
By admin | Updated: June 29, 2017 00:26 IST