मालेगाव : वन कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी येथील सर्व क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.तालुक्यातील कळवाडी येथील वन कक्ष क्र. ४५१मध्ये दहिवाळचे वनपाल व्ही.एस. बोरसे, चिंचगव्हाणचे वनरक्षक बी. के. गोवेकर गस्त घालत असताना २१ आॅक्टोबर रोजी अनधिकृतपणे विहिरीचे खोदकाम करण्यात येत होते. याप्रकरणी धनराज खैरनार व त्यांच्या दोन मुलांना पकडले असता धनराज व त्यांच्या मुलांनी गोवेकर यांना मारहाण केली. यावेळी बोरसे यांना धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी २२ आॅक्टोबर रोजी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला १५ दिवसांचा कालावधी लोटलेला असताना अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारपासून वनकर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले असल्याची माहिती महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेचे अध्यक्ष अतुल देवरे यांनी दिली. आंदोलनात व्ही. एस. बोरसे, ए.पी. भडांगे, बी. एस. सूर्यवंशी, टी.जी. देसाई, पी.एस. पवार आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)
मालेगावी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By admin | Updated: November 6, 2015 22:18 IST