नाशिक : नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तीच्या कथित जमीन घोटाळाप्रकरणी २३ पैकी एकमेव संशयित आरोपीला अटक करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पितळ उघडे पडले असून, जानेवारीत गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस सुटीवर गेलेले अशोक खंडेराव अहेर हे गेले तीन महिने जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित नोकरीवर असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांचा तपास न करताच, फरार घोषित केल्याचे स्पष्ट झाले आहे. नांदगावच्या कथित जमीन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ५ जानेवारी २०१७ रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर तत्कालीन मंडळ अधिकारी अशोक खंडेराव अहेर यांना गुरुवार, दि. १३ एप्रिल रोजी अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या म्हणण्यानुसार अहेर यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी फेटाळला तेव्हापासून ते फरार झाले होते. प्रत्यक्षात अहेर यांची गुन्हा दाखल होण्यापूर्वी एक वर्ष अगोदर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प कार्यालयात अव्वल कारकून या पदावर बदली झाली आहे व ज्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला त्यावेळी अहेर हे राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प कार्यालयात कार्यरत होते. फरार जाहीर केल्यानंतर लाचलुचपत खात्याची लबाडी एवढ्यावरच थांबली नाही, तर ज्यावेळी गुन्हा दाखल झाला, त्यानंतर दोन वेळेस लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील अधिकाऱ्यांनी अहेर यांची नियुक्ती असलेल्या राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प कार्यालयात दोन वेळा हजेरी लावून अहेर यांचे जाबजबाबही नोंदवून घेतल्याची माहिती अहेर यांच्या कार्यालयातून देण्यात आली. याचाच अर्थ अशोक अहेर हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या संपर्कात असतानाही त्यांना फरार घोषित करण्यामागे नेमका हेतू काय, याविषयी उलटसुलट चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)
आश्चर्य : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पितळ उघडे
By admin | Updated: April 16, 2017 00:29 IST