नाशिक : तलाव, नदीमध्ये बोट चालताना सर्वांनीच बघितली आहे किंबहुना नौकाविहाराचाही आनंद अनेकांनी घेतला असेल; मात्र पर्यावरणपूरक म्हणून ओळखले जाणारे वाहन अर्थात सायकल चक्क गोदापात्रात चालविण्याचा नावीन्यपूर्ण आश्चर्यकारक प्रयोग सण्डे सायन्स स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे करून दाखविल्याने अनेकजण थक्क झाले.शहरातील सण्डे सायन्स स्कूलमध्ये शिकणाऱ्या माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी वर्षाच्या अखेरीस आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत व इंटरनेटवरील माहितीचा आधार घेत चक्क पाण्यात चालणारी सायकल तयार केली. या सायकलची आज रविवारी (दि.३) गोदावरीवरील रामकुंडानजीकच्या गांधी तलावात तिसरी चाचणी घेण्यात आली. सुमारे पंचवीस मिनिटे आठवी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी या सायकलवरून गांधी तलावात फेऱ्या मारल्या. सदर चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे स्कूलचे शिक्षक रूपेश नेरकर यांनी सांगितले. साधी सायकल त्यामध्ये कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान न वापरता विद्यार्थ्यांनी केवळ कल्पनाशक्तीच्या जोरावर सायकलच्या दोन्ही चाकांना दुतर्फा २५ लिटरच्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा आधार दिला. दरम्यान, मागील चाकाच्या रिंगमध्ये असलेल्या तारेवर पत्र्याच्या वीस पट्ट्या लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे सायकलला पॅँडल मारल्यानंतर चाक सहज फिरत होते व नदीपात्रातील पाणी त्या पट्ट्यांच्या आधारे मागे फेकले जाऊन सायकल पुढे चालत होती. दुतर्फा लावलेल्या बाटल्यांमुळे सायकलला पाण्यावर तरंगत राहण्यास व तोल सांभाळण्यास मदत झाली. (प्रतिनिधी)
सायकल चक्क गोदापात्रात चालविण्याचा आश्चर्यकारक प्रयोग
By admin | Updated: May 4, 2015 01:13 IST