नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य शासनानेही आता ‘बाल स्वच्छता अभियान’ राबविण्याबाबत निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती शोभा सुरेश डोखळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षित बालके, पोषण आहार लाभार्थी, बालकांची वजने, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या रिक्त पदांबाबत आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त यांनी ३ नोव्हेंबर २०१४ रोजी काढलेल्या आदेशानुसार १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान ‘बाल स्वच्छता अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार या सप्ताहाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश शोभा डोखळे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांना दिले. या बाल स्वच्छता अभियानात अंगणवाडी केंद्र व परिसरात पत्रकानुसार दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहेत. बैठकीस सदस्य कलावती चव्हाण, सुरेखा गोधडे, सुरेखा जिरे, सीमा बस्ते, शीला गवारे, सोनाली पवार, अलका साळुंखे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अंगणवाड्यांमध्येही राबविणार ‘स्वच्छता अभियान’ महिला बालकल्याण समितीचा निर्णय
By admin | Updated: November 12, 2014 01:18 IST