येवला : ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिलेची प्रसूती करण्याच्या वेळी परवड झाल्याने अखेर या महिलेला खासगी रुग्णालयात जाऊन हलाखीच्या परिस्थितीत २५ हजार रुपये मोजावे लागले, या घटनेमुळे मातुलठाण येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन बाळंतपणासाठी खाजगी रुग्णालयात झालेल्या खर्चाची भरपाई या घटनेस जबाबदार वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचेकडून वसूल करण्याची मागणी या महिलेसह सामाजिक कार्यकर्ते हिरालाल घुगे यांनी केली. मातुलठाण येथील पूजा दीपक बागुल ही महिला गेल्या चार महिन्यांपासून येवला ग्रामीण रुग्णालयात गरोदरपणात उपचार घेत होती. रीतसर नावनोंदणीदेखील ग्रामीण रुग्णालयात केली होती. परंतु ऐन बाळंतपणाच्या वेळी येथील कर्मचारी व डॉक्टरांनी या महिलेला शब्दभंबाळ करून तुम्हाला हाच दवाखाना दिसतो का?, नगरसूल, सावरगाव येथे का गेले नाही? येथे बाळंतपण करणारे डॉक्टर नाहीत अशी प्रश्नांची सरबत्ती केली व इलाज केलाच नाही. या महिलेला तिचे नातेवाईक कमलाबाई झाल्टे, लक्ष्मण झाल्टे, संगीता झाल्टे यांनी एका खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी हलविले.गेल्या दहा वर्षांपूर्वी पूजाचे वडील गंगादरवाजा भागातील गणेशकुंड स्वच्छ करत असताना कर्तव्यावर विषारी वायूने मृत्युमुखी पडले होते. यानंतर समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक हातभार लावत पूजाचे शिक्षण व लग्न केले होते. परंतु ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या असहकारामुळे या महिलेवर कठीण परिस्थिती ओढवली, या प्रकरणी आरोग्य सेवा खात्याचा टोल फ्री क्रमांक १०४ वर तक्रार करण्याचा प्रयत्न महिलेने केला, परंतु आरोग्य खात्याचीच बाजू सावरण्याचा प्रयत्न या क्रमांकावरून झाल्याचे महिलेने तक्रार अर्जात नमूद केले आहे. अशी कठीण परिस्थिती अन्य गरोदर महिलेवर येऊ नये अशी अपेक्षा पूजा बागुल व परिसतील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
प्रसूतीच्या वेळीच महिलेची परवड
By admin | Updated: September 5, 2015 22:00 IST