नाशिकरोड : जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील उमाभक्ती अपार्टमेंटमध्ये तीन दिवसांपूर्वी एका महिलेच्या झालेल्या खुनाचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. श्री राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील उमाभक्ती अपार्टमेंटमध्ये राहणारी महिला नंदा अनिल कंपलीकर (५०) यांचा फ्लॅटमधील स्नानगृहात पाठीमागे हात बांधून व कापडाने गळा आवळून खून केलेला कुजलेला मृतदेह बुधवारी सायंकाळी सापडला होता. मयत नंदा यांचा खून गेल्या रविवारी सायंकाळनंतर करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस तपासामध्ये सदर महिलेचे चार लग्न झाले असून, तिचा अनैतिक व व्याजाचा व्यवसाय असल्याचे निष्पन्न झाले आहे. खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेच्या मोबाइलवर येणारे-जाणारे मोबाइल क्रमांक व तिच्या घरी येणाऱ्या-जाणाऱ्या संबंधितांचा शोध घेत तपासाची चक्रे फिरविली आहे. खुनाच्या घटनेनंतर तीन दिवसांत जवळपास २५-३० जणांची नाशिकरोड पोलिसांनी चौकशी केली आहे. मात्र शनिवारी सायंकाळपर्यंत खुनाचा उलगडा होऊ शकला नव्हता. पोलिसांनी सर्व स्तरावरून तपास चालविला आहे. (प्रतिनिधी)
महिलेच्या खुनाचा अद्यापही तपास नाही
By admin | Updated: July 31, 2016 00:50 IST