इंदिरानगर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समर्थनार्थ शहरातील कॉँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले खरे; परंतु त्याचवेळी मोजकेच कार्यकर्ते आणि गांभीर्याचा अभाव अशा स्थितीत आंदोलक रस्त्यावर ठिय्या मारत नाही तोच पोलिसांनी कार्यकर्त्यांची उचलबांगडी करून व्हॅनमध्ये बसवले आणि आंदोलन संपुष्टात आले.आदर्श घोटाळ्याचा आरोप असलेल्या अशोक चव्हाण यांच्यावरील आरोपांच्या सीबीआय चौकशीला राज्यपालांनी परवानगी दिल्याचे निमित्त करून चव्हाण यांच्या समर्थनार्थ कॉँग्रेसने द्वारका चौफुलीवर आंदोलन करण्याचे घोषित केले होते. मात्र, पोलिसांनी अगोदरच चौफुलीच्या मार्गावर नाकेबंदी केली होती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहराध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते ‘दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत आले आणि रस्त्यावर ठिय्या मांडण्याच्या आतच पोलिसांनी त्यांची उचलबांगडी केली. हसत- खेळत पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांना काही वेळाने पोलिसांनी सोडून दिले. विशेष म्हणजे आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक होती. आंदोलनात हनिफ बशीर, वैभव खैरे, जावेद इम्रान, रफीक शेख, फारूक कुरैशी, नजमुल शेख, यास्मिन शेख, रूबिना शेख तसेच अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोणतेही फलक हाती नसलेल्या कार्यकर्त्यांनी नंतर मात्र साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायदा पुन्हा लागू करावा, अशी मागणीही केल्याचे सांगितले.
‘रास्ता रोको’च्या आतच कॉँग्रेस कार्यकर्ते ताब्यात
By admin | Updated: February 8, 2016 23:59 IST