नाशिक : गेल्या वर्षी थर्टीफर्स्टच्या संध्येपासून नववर्षाच्या पहाटपर्यंत सलग बारा तास गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवर चालण्याचा स्वत:चा विक्रम रंजय बच्चन त्रिवेदी यांनी आज मोडला. यावर्षी त्यांनी सलग शंभर तास चालण्याचा निश्चय केला असून, बुधवारी संध्याकाळपासून (दि. ३१) त्यांनी चालण्याला आरंभ केला आहे. समाजामध्ये असलेली व्यसनाधीनता नष्ट व्हावी अन् तरुणाईने निरोगी जीवन जगण्यासाठी विविध व्यसनांपासून फारकत घ्यावी, या सामाजिक उद्देश्याने गेल्या दोन वर्षांपासून त्रिवेदी चालण्याचा उपक्रम पार पाडत आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मदीराच्या आहारी तरुणांनी जाऊ नये, निरोगी जीवन जगावे आणि व्यसनमुक्त देशाची भावी पिढी घडवावी असा मनोदय त्रिवेदी यांनी यावेळी व्यक्त केला. ‘गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये चीन देशाच्या एका अॅथेलिटीक्सच्या नावावर सलग ४४६ मैल चालण्याचा विश्वविक्रमाची नोंद आहे. हा विक्रम मोडीत काढण्यासाठी सलग ५०० मैल म्हणजेच सरासरी आठशे किलोमीटर त्रिवेदी यांना चालावे लागणार आहे व त्यांनी त्याचा दृढनिश्चय केला आहे. गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवर चालणार आहे. ते गेल्या बुधवारपासून चालत असून, आज सकाळी त्यांचे ४८ तास पूर्ण होतील.दरम्यान, आलेली झोप टाळण्यासाठी त्रिवेदी दर तासाला ब्लॅकटी, लेमन टी, कॉफी घेत आहेत. तसेच सहा तासांमध्ये एक चमचा प्रोटीन पावडर ते खात असून, सलग गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवर चालत आहे. बुधवारी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक, पोलीस अधिकारी सायकलिस्ट हरिष बैजल, नगरसेवक सुजाता डेरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शंभर तासांत ते चालणार ५०० मैल
By admin | Updated: January 2, 2015 00:47 IST