नाशिक : शहराच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू समजल्या जाणाºया सार्वजनिक वाचनालयाच्या फेरमतमोजणीची प्रक्रिया अखेरीस पार पडून तीन मतांनी ज्येष्ठ साहित्यिक बी. जी. वाघ विजयी झाले. मंगळवारी (दि. ७) सकाळी ८.३० वाजेपासून सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे फेरमतमोजणीस प्रारंभ झाला. आठ फेºया होऊन दुपारी १ वाजता मतमोजणी पूर्ण झाली. दीड वाजता निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी रीतसर निकालाची घोषणा केली. नानासाहेब बोरसे यांनी पुष्पगुच्छ देऊन वाघ यांचे स्वागत केले. याप्रसंगी सावानाचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. सावाना परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी न्यायालयाच्या आदेशानुसार फेरमतमोजणी तातडीने घेण्यात आली. दोन्ही उमेदवारांना सोमवारीच फेरमतमोजणी संदर्भातले पत्र देण्यात आले होते; मात्र धनंजय बेळे यांनी पत्र स्वीकारले नाही. एकूण नऊ कर्मचाºयांसह आठ फेºयांमध्ये ही प्रक्रिया पार पडली. १९९५ मतपत्रिकांपैकी १११ बाद झाल्यानंतर उर्वरित १८८४ मतपत्रिकांची फेरमोजणी यावेळी करण्यात आली. सावानाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी ३ एप्रिलला झाली होती. यावेळी १५ व्या क्रमांकाची मते मिळालेले धनंजय बेळे आणि १६ व्या क्रमांकाची मते मिळालेले बी. जी. वाघ यांच्या मतांमध्ये एक मताचा फरक आल्याने वाघ यांनी फेरमतमोजणी घ्यावी, असा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केला होता. बहुमतामुळे ग्रंथमित्र पॅनलकडून आता चांगल्या कामकाजाची अपेक्षा नाशिककरांकडून करण्यात येत आहे.
सावाना फेरमतमोजणीत वाघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:52 IST