तौक्ते चक्रीवादळ जसजसे मुंबईच्या जवळ येत गेले तसे नाशिकचे हवामानदेखील वेगाने बदलत गेले. सर्वत्र ढगाळ हवामान आणि वाऱ्याचा वाढलेला वेग अधूनमधून येणाऱ्या हलक्या सरी असे वातावरण दिवसभर नागरिकांना अनुभवयास आले. शहराच्या वातावरणात सकाळी आर्द्रता ८१ टक्के इतकी मोजली गेली. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत शहरात केवळ १.६ मिमीपर्यंत पाऊस झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. दिवसभर पावसाच्या सरींचा वर्षाव जरी होत नसला तरीदेखील वाऱ्याचा वेग हा सरासरी १८ किमी प्रतीतास इतका होता. दिवसभरात वारे वेगाने वाहू लागल्यामुळे नागरिकांतही भीतीचे वातावरण पसरले होते. अतीउंचीवरील होर्डिंग्जदेखील वाऱ्याच्या वेगाने अक्षरक्ष: जमिनीच्या बाजूने झेपावले होते. तीन ते चार ठिकाणी दुपारपर्यंत झाडे पडल्याचे ‘कॉल’ अग्निशमन दलाला प्राप्त झाले होते. ढगाळ हवामान आणि वेगाने वाहणारे वारे दिवसभर कायम होते.
तौक्ते चक्रीवादळ मुंबईच्या जवळून जाणार असल्यामुळे हवामान खात्याकडून नाशिकलादेखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशकात जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती नियंत्रणासाठी आपत्कालीन कक्ष उभारण्यात आला होता. प्रशासनाकडून मनपा अग्निशमन दल, जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन टीमला ॲलर्टवर ठेवण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्याचा वेग कायम होता.