नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर आणि दारणा या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, त्यामुळे नाशिककरांवरील वाढीव पाणीकपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. पावसाने दडी मारल्याने महापालिका प्रशासनाने आणखी पाणीकपातीसंबंधी फेरनियोजन करण्याचे सूतोवाच केले होते. दरम्यान, दारणा धरणात सुमारे ८०० दलघफूने पाणीसाठा वाढल्याने नाशिकरोड विभागासाठी महापालिकेकडून आरक्षित पाण्याचा पुन्हा उपसा केला जाण्याची शक्यता आहे. आर्द्रा नक्षत्राच्या अंतिम चरणात शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाची प्रतीक्षा संपुष्टात आली. शहरात १ जून ते ४ जुलै २०१६ या कालावधीत शहरात १३७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यापैकी, रविवारी झालेल्या पावसाची आकडेवारी ११२ मि.मी. नोंदविली गेली. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात झालेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात २८ दलघफूने वाढ झाली. त्यामुळे गंगापूरमध्ये ९३३ दलघफू पाणीसाठा जाऊन पोहोचला आहे.दारणा धरणात दोन दिवसांपूर्वी ३४० दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. पावसामुळे त्यात ७६२ दलघफूने वाढ होऊन पाणीसाठा ११०२ दलघफूपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मागील वर्षी गंगापूर धरणात ४ जुलै रोजी ३३५६ दलघफू म्हणजे ६० टक्के, तर दारणा धरणात ३७६१ दलघफू म्हणजे ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
वाढीव पाणीकपातीचे संकट टळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 00:25 IST