नाशिक : जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलानंतर आता गटनेते बदलाचे वारे जोरात वाहू लागले असून, गटनेतेपदांची नोंदणी करणारे तीन प्रमुख पक्षांचे जिल्हाप्रमुखच बदलल्याने या गटनेते बदलाच्या प्रयत्नांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तशीही जिल्हा परिषदेच्या घटनेत गटनेते बदलाला कायदेशीर मान्यताच नसल्याने ते राहिले काय किंवा बदलले काय यामुळे कामकाजात फारसा फरक पडणार नसल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेत कामकाजाच्या सोयीसाठी राजकीय पक्षांकडून आपापल्या पक्षाची मोट बांधून त्यांना पक्षाचा आदेश (व्हीप) बजावण्यासाठी त्या-त्या राजकीय पक्षांकडून जिल्हा परिषदेत गटनेता पद निर्माण करण्यात आले असून, त्याची नोंदणी त्या-त्या राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्ष अथवा जिल्हाप्रमुखांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गटनेतेपद हे पक्षाने प्रकाश वडजे यांच्याकडे सोपविल्याचे प्रतिज्ञापत्रावर नोंदविले आहे. तशीच प्रक्रिया शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांनी शिवसेनेचे गटनेतापद प्रवीण जाधव यांच्याकडे सोपविताना केली आहे. भाजपाचे गटनेतेपद हे केदा अहेर यांच्याकडे सोपविण्याबाबत तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब अहेर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदविलेले आहे.
गटनेतेपद बदलाची संक्रांत टळणार? नोंदणी करणारे बदलले तीनही जिल्हाप्रमुख
By admin | Updated: November 15, 2014 00:27 IST