नाशिक : नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या गाजलेल्या नटसम्राट नाटकामध्ये ‘घर देता का घर’ या गाजलेल्या संवादाची अनेकदा घर शोधणाऱ्यांकडून आठवण केली जाते. परंतु सध्या नाशिक बीएसएनएलने मात्र आपल्या मालकीची घरे भाड्याने देण्यासाठी घर घेता का घर अशी विचारणा करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारची २०४ घरे, तर भाड्याने देण्याचा प्रस्ताव आहेच, शिवाय निगमच्या कार्यालयीन मिळकतींची उरलेली जागाही भाड्याने देण्यात येणार आहे. अर्थात, घरे किंवा मिळकती राष्ट्रीयीकृत बॅँका, तसेच केंद्र किंवा राज्य सरकारलाच भाड्याने देण्यात येणार आहेत.खासगी दूरध्वनी कंपन्यांशी स्पर्धा करताना निगमच्या नाकीनव येत आहेत. लॅँडलाइनच्या काळात मक्तेदारी असलेल्या निगमचे उत्पन्न घटत चालले असून, अशावेळी पर्यायी स्त्रोत म्हणून निगमच्या मिळकती भाड्याने देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर अशा प्रकारे मिळकती भाड्याने देण्यास सुरुवात झाली. त्यावेळी आडगाव पोलीस ठाण्यास आणि देना बॅँकेस जागा देण्यात आली असून, आता अशाच प्रकारे अन्य मिळकतींची अतिरिक्त जागा, तसेच रिकामी पडलेली निवासस्थाने भाड्याने देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील लासलगाव, मालेगाव, मुसळगाव, तसेच शहरात सातपूर औद्योगिक वसाहत, दत्त मंदिर नाशिकरोड, देवळाली कॅम्प, जीपीओ कॅम्पस्, जेलरोड, मखमलाबाद, पंचवटी येथील विविध कार्यालयांमधील अतिरिक्त जागा भाड्याने देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे २०४ घरेदेखील भाड्याने देण्यात येणार आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांना बदलीहून नाशिकमध्ये आल्यानंतर निवासस्थानांची गरज भासते. निगमने अशाच गरजेपोटी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी क्वॉटर्स आणि बंगले बांधले खरे; परंतु आता निगमच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांची स्वमालकीची घरे घेतली असल्याने ही घरे रिकामी पडून आहेत. मात्र दुसरीकडे अन्य शासकीय खात्यांमधील बदली अधिकाऱ्यांना घरे मिळत नसल्याने त्यांना खासगी इमारतींमध्ये भाड्याने राहावे लागते. त्यामुळे निगमनेही अनायासेच संधी उपलब्ध करून दिली असून, त्यामुळे संबंधिताना घरे मिळू शकतात, असे निगमच्या सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
घर घेता का कुणी घर?
By admin | Updated: October 14, 2014 01:24 IST