नाशिक : सिडको, सातपूर आणि नाशिकरोड येथील महापालिका प्रभाग समिती सभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत फाटाफूट होऊ नये म्हणून राजकीय पक्षांची ‘व्हिप’ची मात्रा चालली आणि तीनही ठिकाणी बिनविरोध निवडीचा ‘शो’ पार पडला. शिवसेनेने सिडको-सातपूरमध्ये आपली उमेदवारी मागे घेत महाआघाडीचा मार्ग मोकळा केला. नाशिकरोड विभागातील मनसेच्या दोन नगरसेवकांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र घोषित केल्याने फुटिरांनी सावध पवित्रा घेतला. बिनविरोध निवडीचे नाट्य घडल्याने फुटिरांना मतदानाला सामोरे जावे लागले नाही. मंगळवारी सातपूर, सिडको आणि नाशिकरोड प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सातपूर प्रभाग सभापतिपदासाठी महाआघाडीने अगोदर राष्ट्रवादीच्या उषा अहिरे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार मनसेचे गटनेता अनिल मटाले यांनी उषा अहिरे यांना मतदान करण्याचा व्हिपही सदस्यांना बजावला होता. मात्र, सोमवारी रात्री समीकरणे बदलली आणि राष्ट्रवादीला पूर्वसाठी उमेदवारी देत सातपूरला मनसेला सभापतिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गटनेत्यांनी पुन्हा पहिला व्हिप मागे घेत मनसेच्या सविता काळे यांना मतदान करण्याचा व्हिप बजावला. मनसेने वर्तमानपत्रातूनही जाहीरपणे व्हिप प्रसिद्ध केला. मनसेबरोबरच माकपचे गटनेते तानाजी जायभावे यांनीही पक्षाचे दोन्ही सदस्य नंदिनी जाधव व सचिन भोर यांना व्हिप बजावत तटस्थ राहण्याचे आदेश दिले.
‘व्हिप’ची बसली ‘किक’
By admin | Updated: April 13, 2016 00:25 IST