बुधवारी साध्या वेशात पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पथकासह एका चारचाकी वाहनातून पेठरोड गाठून अवैध व्यवसाय चालणाऱ्या चाळीत धाड टाकली. दरम्यान, स्थानिक पोलिसांना या कारवाईपासून अगोदरच चार हात लांब ठेवण्यात आले होते. सुमारे दोन तास पाण्डेय स्वतः या भागात तळ ठोकून होते. परिसरात पोलीस पाहून नागरिकांची धावपळ उडाली होती.
पोलिसांनी जुगार अड्ड्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केेला तेव्हा टेबल, खुर्च्या, टीव्ही आढळून आले. सर्व साहित्य जप्त करत संशयिताला ताब्यात घेतले. कारवाईत गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, डॉ. सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे आदींचा सहभाग होता. पेठरोडला पोलीस आयुक्तांनी जुगार अड्ड्यावर छापेमारी केली तो अड्डा राजकीय व्यक्तीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक सत्ताधारी व विरोधक असलेल्या स्पर्धी व प्रतिस्पर्धीत राजकीय वाद असल्याने या अवैध व्यवसायाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असावी व त्यातूनच कारवाई केल्याच्या चर्चेला पेठरोड परिसरात उधाण आले होते.
---इन्फो---
अवैध धंद्यांवर आयुक्तांचा छापा; पण...?
अवैद्य व्यवसायावर छापेमारी करण्यासाठी पोलीस आयुक्त स्वतः पोहोचल्याने त्यांचे आगामी टार्गेट शहरातील सर्व अवैध व्यवसाय असल्याचे स्पष्ट झाले आहे. अवैध धंद्यांवर छापेमारीसाठी दस्तूरखुद्द पोलीसप्रमुखांना रस्त्यावर यावे लागत असल्याने संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रमुख आणि गुन्हे शोध पथक नेमके करते काय, असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे.