नाशिक : महामंडळाच्या जुन्या-नव्या गाड्यांसाठी आवश्यक ते स्पेअर पार्ट उपलब्ध करून दिले जात नसल्याने बसचालकांचे आणि प्रवाशांचे हाल होत असून, गाडी मध्येच बंद पडली, तर भर पावसात प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करेपर्यंत ताटकळत बसावे लागते. असाच प्रकार बुधवारी ग्रामीण भागातून नाशिककडे येत असलेल्या एका बसबाबत घडला. जिल्ह्यात पावसाने जोर धरला असल्याने प्रत्येकाला घरी जायची घाई. अशा परिस्थितीत क्रमांक एमएच ०७ टी ९१२७ या बसचे टायर अंदरसूल येथे पंक्चर झाले. त्या बसला कोणतेही स्पेअर पार्ट देण्यात आलेले नसल्याने दुसऱ्या बसमधून टायर येईपर्यंत आणि प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत अंदरसूल येथे अडकून पडावे लागले होते. या प्रकारामुळे गाडीतील प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत बसचालक आणि वाहकाला जेरीस आणले होते. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ या प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले होते. डेपो क्रमांक १ मधील अनेक बसेसला स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्याचा दावा काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. सुमारे ३५ बसेसमध्ये तर स्टेपनीही उपलब्ध नसल्याने चालक आणि वाहकांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तरी या बसेसना पावसाच्या पार्श्वभूमीवर त्वरित साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
प्रवासात बस पंक्चर होते तेव्हा...
By admin | Updated: July 24, 2014 01:00 IST