शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ निराधारांनी काय खायचे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:13 IST

नाशिक : मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लोकांच्या देणगीवर चालणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था अडचणीत आल्या असून, देणगीचा ओघ ...

नाशिक : मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लोकांच्या देणगीवर चालणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था अडचणीत आल्या असून, देणगीचा ओघ कमी झाल्याने वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शाळा यांचे भविष्यात काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजचे अन्न, औषधोपचार यांचा खर्च भागवताना संस्था चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागीलवर्षी असलेले लॉकडाऊन आणि आता पुन्हा नव्याने आलेले निर्बंध यामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींची वेतन कपात झाली, याचा परिणाम साहजिकच सेवाभावी संस्थांच्या देणग्यांवर झाला आहे. यामुळे अनाथांना आणि वृद्धांना आश्रय देणाऱ्या या संस्थांना दैनंदिन खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक संस्था आज मिळालेल्या देणगीतून भविष्याची तरतूद करत असतात. यामुळे वर्षानुवर्ष त्यांचे काम सुरळीत सुरु आहे. मात्र, कोरोनाच्या संकटाने या संस्थांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे.

चौकट-

निफाड तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील सैंगऋषी वृद्धाश्रमात सध्या १० निराधार वृद्ध आहेत. ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा रस्त्यावरील वृद्धांना येथे आधार दिला जातो. संस्था सध्या खूपच अडचणीतून जात असून, हात उसने घेतलेल्या पैशांवर नवनाथ जराड हे संस्थेचा खर्च भागवत आहेत. संस्थेच्या देणगीचा ओघ पूर्णपणे आटला आहे.

चौकट -

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आधाराश्रमात राज्यातील ३० जिल्ह्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ८५ मुले सध्या शिक्षण घेत आहेत. पूर्णपणे देणगीवर चालणाऱ्या या संस्थेला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात एक दिवस काहीच नसल्यामुळे मुलांवर उपाशी झोपण्याची वेळ आली होती. आर्थिक अडचणीमुळे काही मुलांना संस्थेने स्वखर्चाने घरी पाठवले पण उर्वरित मुलांचा खर्च करावाच लागत आहे.

चौकट-

६७ वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकमधील आधाराश्रम या संस्थेत स्मृती भाेजन आणि प्रीती भोजन योजना चालते. कोविडच्या संकटामुळे सध्या या दोन्हीही योजना पूर्णपणे बंद असल्याने संस्थेला आर्थिक अडचणी येत आहेत. संस्थेला मिळणाऱ्या देणगीचा ओघ बंद झाला आहे. सध्या साठवलेल्या पैशांतून संस्थेचा खर्च सुरु आहे.

चौकट-

वात्सल्य परिवार फाऊंडेशन या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या संस्थेत सध्या ९० वृद्ध आश्रयाला आहेत. मात्र, देणग्यांचा ओघ कमी झाल्याने सध्या संस्थाचालक स्वत:कडील पैशांतून संस्थेचा खर्च भागवत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिकांची भेट होत नसल्याने देणग्या मागायच्या कुणाकडे, असा प्रश्न संस्थेला पडला आहे.

कोट-

रस्त्यावर फिरणाऱ्या निराधारांना आमच्या आश्रमात आश्रय दिला जातो. सध्या आर्थिक अडचणींमुळे नव्याने वृद्धांना प्रवेश देता येत नाही. आमची शेतीची कामे बंद झाल्यामुळे नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन मी सध्या वृद्धाश्रमाचा खर्च चालवत आहे. जवळपास ५० हजारांचे कर्ज आज झाले आहे.

- नवनाथ जराड, संस्थापक, सैंगऋषी वृद्धाश्रम, लौकी शिरसगाव

कोट -

आधाराश्रमातील मुलांचा अन्नधान्य, औषधोपचार यांचा खर्च मोठा आहे. सध्या देणग्यांचा ओघ खूपच मंदावला आहे. यामुळे आहे त्या पैशांतून सध्या खर्च भागवला जात आहे. आज मिळालेल्या देणग्यांमधून भविष्याची तरतूद केली जाते, पण सध्या देणग्या मिळत नसल्याने भविष्याची तरतूद कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- राहुल जाधव, दत्तक समन्वयक, आधाराश्रम, नाशिक