सातपूर : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी धरणातील विहिरीचे काम अपूर्णास्थेत असून, अनेक वर्षांपासून रेंगाळलेले आहे. सदर विहिरीमुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे निवेदन मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.नासर्डी तथा नंदिनी नदीचे उगमस्थान असलेले महिरावणी धरण ४३ वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. या धरणातून पंचक्रोशीतील महिरावणी, बेलगाव ढगा, खंबाळे, तळेगाव, दुडगाव आदि गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पुरवठा होतो. त्यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. सध्या झालेल्या पावसामुळे धरण भरले आहे. १९७२ पासून या धरणाची कुठलीही डागडुजी करण्यात आलेली नाही. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आल्यानंतर यावर्षी १४ व्या वित्त आयोगामधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून पाण्याची गळती होऊ नये म्हणून विहिरीचे काम सुरू करण्यात आले, परंतु काम मध्येच पुन्हा थांबविण्यात आले आहे. सदर विहिरीवर कोणत्याही प्रकारचे झाकण नाही. बनविलेले स्टॅण्डही अपूर्णस्थितीत आहेत. पावसाळ्यात धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. (वार्ताहर)
महिरावणी धरणातील विहीर धोकादायक स्थितीत
By admin | Updated: July 27, 2016 00:17 IST