न्यायडोंगरी : संपूर्ण राज्यात पाण्याचा प्रचंड तुटवडा असताना तसेच धरणातील पाणी पळवापळवीचा संघर्ष असताना पिंपरखेड, तालुका नांदगाव येथील शेतकरी राजेंद्र रावसाहेब मोरे यांनी शेतात खोदलेल्या कूपनलिकेस (बोरवेल) इतके पाणी लागले की, कोणत्याही पंपाशिवाय नैसर्गिकरीत्या कूपनलिकेतून पाणी ओसंडून वाहत आहे हा चमत्कार बघण्यासाठी गावकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी मोरे यांच्या शेताकडे धाव घेतल्याने प्रचंड गर्दी होऊन सर्वत्र एकच चर्चेचा विषय बनला आहे.मोरे यांनी सोमवारी (दि. १०) आपल्या शेतात उभी पिके वाचविण्यासाठी तीन ठिकाणी कूपनलिकेचे खोदकाम केले. सदर खोदकाम सुमारे १८० ते २०० फुटापर्यंत करूनही तिन्ही ठिकाणी साधा पाण्याचा ओलावाही न निघाल्याने सर्व मेहनत व पैसा वाया गेला म्हणून सर्व निराश होऊन घरी निघून आले. कूपनलिका खोदणारे आपली मजुरी घेत रवाना झाले. घरातील परिवरातील सर्व सदस्य निराश होऊन चर्चा करीत असताना त्यांचा इयत्ता पाचवीत शिकणारा (बाहेरगावी) मुलगा ही सर्व चर्चा ऐकत असताना नेमके कशात पैसे वाया गेले याचे कुतूहल वाटून शेताकडे धाव घेतली आणि ज्या कोरड्याठाक असलेल्या कूपनलिकेबाबत आई-वडील चर्चा करीत असलेल्या तीनपैकी एका कूपनलिकेतून पाणि ओसंडून वाहत असल्याचे त्याच्या नजरेस पडले. हा अचानक झालेला चमत्कार बघून त्याने घराकडे धूम ठोकली व बघितलेला प्रकार आईवडिलांबरोबरच गावकऱ्यांनाही सांगितला असता त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नव्हते; परंतु पोटचा मुलगा सांगतो म्हणून आईवडिलांसह काही शेतकरी शेताकडे गेले असता हा सर्व प्रकार खरा दिसून आला. आजही सदरच्या कूपनलिकेतून सुमारे दोन इंचाचे पानी ओसंडून वाहत आहे. हा हा म्हणता याची वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरून मोरे यांच्या शेतात हा चमत्कार बघण्यासाठी गर्दी उसळून तालुकाभर चर्चेचा विषय झाला आहे. (वार्ताहर)
न्यायडोंगरीत कूपनलिकेला पाणीच पाणी
By admin | Updated: November 11, 2015 22:53 IST