सप्तशृंगगड : गडाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची विद्युत मोटर जळून गेल्याने गेल्या दहा ते बारा दिवसांपासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान व पर्यटनस्थळ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर गेल्या दोन महिन्यांपासून संततधार सूरू असल्याने गडावर पाणीपुरवठा करणारा भवानी पाझर तलाव पूर्ण पणे भरला असून ओसंडून वाहू लागला आहे. परंतु धरण उशाशी व कोरड घशाशी अशी अवस्था येथील ग्रामस्थांची दहा ते बारा दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मागील गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून गडावरील भवानी पाझर तलावाचे गळती थाबंविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कारण आठ ते नऊ महिने नळाला पाणीच आले नाही व त्यावेळी ग्रामपंचायतीने पाण्याचे टॅँकर सुद्धा उपलब्ध करून दिले नाही, त्यामुळे येथील सर्वच ग्रामस्थांना पाण्याचे टॅँकर विकत घेऊन पन्नास ते साठ हजार रूपयांचा भुर्दंड सोसावा लागला. आता पाणी असूनही ते प्यायला मिळत नसल्याने ग्रामस्थांन मध्ये संतापाची लाट पसरली आहे . पंधरा आॅगस्टला ग्रामसभेत ग्रामस्थांनी पाण्याविषयी पाणी येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर तक्र ारी ही केल्या, परंतु त्या तक्र ारी फक्त कागदावरच राहिल्या की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तक्र ार केल्यानतंर ग्रामस्थांची मनधरणी करण्यासाठी फक्त दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात आला, त्यानंतर नळाला पाणीच येणे बंद झाले.
सप्तशृंगगडावरील पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:50 IST