नाशिक : जुन्या नाशकात भोईगल्ली परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रक्तमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांचा संयम शुक्रवारी सुटला. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी परिसरात जाऊन प्रत्यक्ष माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण करत जाब विचारला. त्यानंतर, महापालिकेने शोधमोहीम सुरू केली असून, दोन-तीन ठिकाणांहून सदर रक्तमिश्रित पाणी मिसळत असल्याचे लक्षात आले आहे. त्याबाबत संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.रक्तमिश्रित पाण्याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती, परंतु महापालिकेने पाइपलाइन दुरुस्त करण्याचे काम करूनही रक्तमिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच आहे. रक्तमिश्रित पाणीपुरवठा थांबत नसल्याने शुक्रवारी परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे तक्रार केली. फरांदे यांनी तत्काळ भोईगल्ली परिसरात धाव घेऊन नागरिकांकडून माहिती जाणून घेतली व प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे शहर उपाध्यक्ष अनिल भालेराव, गणेश कांबळे, संपत जाधव हे सुद्धा होते. त्यावेळी, रक्तमिश्रित पाण्याच्या बाटल्या नागरिकांनी समोर आणल्या. हा सारा धक्कादायक प्रकार पाहून आमदार देवयानी फरांदे यांनी तत्काळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले तसेच आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशीही संवाद साधत त्यांना स्थितीची कल्पना दिली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता उत्तम पवार, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, खाडे तसेच सहायक आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे हे तातडीने हजर झाले. याचवेळी संतप्त जमावामुळे भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे हेदेखील उपस्थित झाले. यावेळी अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी तातडीने रक्तमिश्रित दूषित पाणी कुठून येते याची शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शोधमोहीम सुरू करण्यात आली. (प्रतिनिधी)
जुन्या नाशकात रक्तमिश्रित पाणीपुरवठा
By admin | Updated: December 24, 2016 01:38 IST