निफाड : तालुक्याच्या पूर्व भागातील चार गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली.तालुक्यातील वाहेगाव, दहेगाव, भरवस, मानोरी खुर्द या चार गावांत या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू होते. मध्यंतरी पाऊस चांगला झाल्याने दि. १९ जुलै रोजी या ४ गावातील टँकर बंद करण्यात आले होते; परंतु येथील नागरिकांनी व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, राजाभाऊ दरेकर, संदीप सोनवणे यांनी पुन्हा हे टँकर चालू करण्याची मागणी केल्याने गटविकास अधिकारी पगार यांनी वरील चार गांवासह इतर गावांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधून पिण्याच्या पाण्याची परिस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर तातडीने प्रशासकीय पातळीवर वेगाने कार्यवाही करीत यातील वाहेगाव येथे लगेच दि. २३ जुलै रोजी लासलगाव मार्केट कमिटी व लासलगाव ग्रामपंचायत यांचे प्रत्येकी एक टँकरने पाणीपुरवठा सुरू करून येथील पाण्याचा प्रश्न सोडवला होता. वरील चारही गावात शासकीय पाण्याचे टँकर गुरु वारपासून (दि. २८) सुरळीतपणे सुरू केले आहेत. वाहेगाव, दहेगाव, मानोरी खुर्द व भरवस ही चार गावे मिळून एक टँकर पाण्याचा दररोज पुरवठा करीत असून, दररोज हा टँकर वाहेगावला दोन फेऱ्या तर दहेगाव व मानोरी आणि भरवस या तीन गावात दररोज प्रत्येकी एक फेरी मारून पाणीपुरवठा करीत आहे. हे टँकर पुन्हा सुरू झाल्याने या गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे मानोरी खुर्द व भरवस येथेही वरील दोन गावांबरोबर टँकरची मागणी आली होती; परंतु मानोरी व भरवस ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच वावधाने यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून तातडीने लक्ष घालून स्वत: खर्च करून मानोरी व भरवस येथे टँकर सुरू करून नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला आणि आता गुरुवारपासून वावधाने यांच्या शेतातील विहिरीचे पाणी गावच्या पाणीपुरवठा योजनेला जोडून ते पाणी गावच्या टाकीत टाकून मानोरीला पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. (वार्ताहर)
वाहेगावसह चार गावांत टँकरने पाणीपुरवठा
By admin | Updated: July 30, 2016 21:25 IST