सातपूर : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी साठ्यात घट होत असताना औद्योगिक क्षेत्रावरही जलकंसट कोसळले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसे पाणी नसल्याने आता एकूण वीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार अतिरिक्त पाच टक्के पाणीकपात येत्या काही दिवसात होणार आहे.सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत आधी दहा मग पंधरा अशी पाणीकपात करण्यात आली आहे; मात्र धरणात पुरेसा साठा नसल्याने आणि त्यामुळेच पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच औद्योगिक वसाहतीला एकूण २० टक्के पाणीकपात करावी, अशा सूचना जलसंपदा विभागामार्फत करण्यात येत असून त्या अनुषंगाने आता पाणीकपात करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून ही कपात लागू करण्यात येणार असली तरी त्याची अद्यापी अंमलबजावणी सुरू झालेली नाही. तथापि, अंमलबजावणी करण्याची तयारी महामंडळाने सुरू केली आहे. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीला गंगापूर धरणातूनच पाणीपुरवठा होतो.महामंडळाने प्रतिदिन २४ दशलक्ष लिटर्स क्षमतेचे उपसा आणि जलशुद्धीकरण केंद्र बांधले असले तरी सध्या २० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यातही पंधरा टक्के अगोदरच कपात करण्यात आली होती. आता ही कपात आणखी वाढविण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. त्यादृष्टीने चालू महिन्यात त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपअभियंता संजय पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
औद्योगिक वसाहतीवर वाढले जलसंकट
By admin | Updated: April 10, 2016 00:09 IST