नाशिक : एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विधायक कार्य घडते आणि अन्य संस्थांसाठी ते कार्य आदर्शवत तसेच मार्गदर्शक ठरते. असेच जलसंवर्धनाचे विधायक कार्य सामाजिक उत्तरदायित्व या संस्थेने करून मुळेगाव आणि वाहेगाव या दोन दत्तक गावांमध्ये हरितक्रांती घडविली आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटलाच, परंतु विहिरींचे पुनर्भरण होऊन शेतीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.अंबड औद्योगिक वसाहतीतील सीटीआर या कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी उभारून श्रमदानातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव व वाहेगाव या गावातील पाणीटंचाई दूर करून जलसंवर्धनाचे काम हाती घेतले. या दोन्ही दत्तक गावांमध्ये विहीर पुनर्भरणाचे पाच प्रकल्प राबविण्यात आले. यासाठी पुण्याच्या वनराई या सामाजिक संस्थेने मदत केली. या गावानजीकच ओढ्याचे खोलीकरण केले. त्याठिकाणी सुमारे चार हजार आंबा आणि पेरूच्या झाडांची लागवड करण्यात आली. शेतकºयांना बियाणांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे जलसंवर्धनाच्या या कामात गावातील पुरुषांबरोबर महिलांनीदेखील सहभाग घेतला. मातीच्या नालाबांधाची दुरुस्ती करण्यात आल्याने गावाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आता गावकºयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. आता पावसाळा असल्याने पुरेसे पाणी आहे. परंतु पूर्वी उन्हाळ्यात पाणीटंचाई असायची आता येथे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकू लागला आहे.
जलसंवर्धनाने घडली दोन गावांत हरितक्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:25 IST