नाशिक : नोव्हेंबर महिना मध्यावर आला असून, नाशिक शहर परिसरात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी वातावरणात विशेष गारवा जाणवत आहे. नाशिकच्या तपमानाचा पारा किमान १२.६ अंश सेल्सिअस एवढा खाली आला आहे. थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून, नाशिककरांनी थंडीपासून बचाव व्हावा यासाठी उबदार कपड्यांच्या खरेदीबरोबरच त्वचेची काळजी घेण्याच्या उद्देशाने विविध सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली आहे.थंडीपासून बचाव व्हावा यासाठी रूसी जॅकेट, जॉर्जिन जॅकेट, स्वेट शर्ट अशा जॅकेट्सच्या विविध प्रकारांबरोबरच वेगवेगळ्या डिझाईन्स असलेल्या शाली, महिला आणि पुरुष यांच्यासाठी विविध स्वेटर्सचे प्रकार, उबदार ब्लँकेट बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अनेक सिनेमांमध्ये अभिनेते तसेच अभिनेत्री परिधान करत असलेले ‘श्रग’ ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. या उबदार कपड्यांव्यतिरिक्त पारंपरिक मफलर, कानटोप्या, कानपट्टी, हातमोजे, अनेकविध मास्कचीदेखील विक्री बाजारपेठेत होत आहे.हिवाळ्यामध्ये हेमंत ऋ तूला सुरुवात होत असल्याने या वातावरणात त्वचा कोरडी पडते तसेच या वातावरणात सांधे दुखी, स्नायूंचे दुखणे अशा विकारांमध्ये वाढ होते तसेच आॅक्टोबर हीटनंतर लगेचच हवेत गारवा निर्माण होत असल्याने सर्दी, खोकला, ताप असे साथीचे आजारदेखील डोकावतात. या साथीच्या आजाराचे विषाणू शीत तपमानात शीघ्र गतीने वाढत असल्याने आपल्या शरीराचे तपमान जास्तीत जास्त उबदार कसे राहील, यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये आपली पचनक्रिया सुधारत असल्याने या दिवसांमध्ये खाण्याला तसेच शरीराचा फिटनेस राखण्यासाठी व्यायाम करण्यालाही विशेष महत्त्व आहे. (प्रतिनिधी)
थंडीत संरक्षणासाठी उबदार जॅकेट्स-शाली बाजारात
By admin | Updated: November 18, 2015 22:17 IST