सिडको : प्रभागसभेत यायचे, अधिकाऱ्यांकडे कामांच्या तक्रारी करायच्या, अन् प्रभागसभा संपली की, अधिकारी मात्र नगरसेवकांनी काय तक्रारी सांगितल्या त्या सोडवतच नाही तर सभेला फक्त चहा-पाण्यासाठी यायचे का? असा संतप्त सवाल करीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. सिडको प्रभागसभा सभापती कांचन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी लाखो रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभागसभेत सर्वच नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. सिंहस्थाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यांपासून अधिकारी हे लोकप्रतिनिधींची कामे करीत नाही. यावेळी नगरसेवक शीतल भामरे यांनी सांगितले की, मोरवाडी स्मशानभूमीत अंत्यविधी झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला सहा महिने व वर्ष उलटूनही मिळत नसून यास संबंधित ठेकेदारच जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच प्रलंबित असलेले दाखले मनपा त्वरित देण्याची व्यवस्था करावी असेही भामरे यांनी सांगितले. स्टेट बॅँक चौपाटीसमोरील मुख्य रस्त्यावरच अनधिकृतपणे थाटलेल्या दुकानदारांवर मनपा प्रशासन कारवाई का करीत नाही, यात मनपाच्या अधिकाऱ्यांचे दुकानदारांशी लागेबांधे आहे का असा प्रश्न नगरसेवक कल्पना चुंभळे व अॅड. अरविंद शेळके यांनी विचारला. तर नगरसेवक सुवर्णा मटाले यांना प्रभाग ४९ मधील माउली लॉन्स जवळच अधिकाऱ्यांचे निवासस्थान असून याच ठिकाणी मुख्य रस्त्यावर भाजी बाजार भरत असतांनाही विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई का केली जात नाही असे सांगितले. नगरसेवक रत्नमाला राणे म्हणाल्या, सर्वच अधिकारी हे कुंभमेळ्यात व्यस्त होते, परंतु आता कुंभमेळा संपला असून अधिकाऱ्यांनंी स्ािंहस्थाप्रमाणेच सिडकोतही कामे मार्गी लावा असे सांगितले. गोविंदनगर ड्रेनेजची समस्या बिकट असून याबाबत मनपाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत गेल्या चार महिन्यांपासून गोविंदनगर भागात घंटागाडीच फिरकत नसल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले. अंबड भागातील अनेक पथदीप बंद असून जनार्दन कॉलनी,फडोळ मळा संपूर्ण अंधारमय झाल्याचे नगरसेवक शोभा फडोळ यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ५२ मध्ये पाणीप्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. गेल्या १० वर्षांपासून अशीच परिस्थिती असून नवीन कनेक्शन देण्यासाठी अधिकारी पुढाकार घेत असल्याने त्यांची दुकानदारी सुरू असल्याचा आरोप नगरसेवक वंदना बिरारी यांनी केला. यावेळी प्रभाग सभापती कांचन पाटील यांनी नगरसेवकांनी सांगितलेल्या तक्रारी अधिकाऱ्यांनी तत्काळ सोडविण्याचे सांगितले. (वार्ताहर)
प्रभाग सभा चहा-पाण्यासाठी
By admin | Updated: September 22, 2015 23:59 IST