वणी/पांडाणे : नाळेगाव शिवारातील पेट्रोलपंपावरील दरोड्याची घटना ताजी असतानाच वणी-सापुतारा रस्त्यावरील माळे दुमाला शिवारातील ब्रह्मा पेट्रोलपंपावर अज्ञात दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांना गंभीर जखमी करून ५५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला असून, याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर ३.१५च्या सुमारास बोलेरो जीप या ठिकाणी आली. त्यातून दोन इसम उतरले व डिझेल गाडीत भरावयाचे आहे असे सांगितले. तद्नंतर त्यांनी आॅईलची मागणी केली. आॅईल देण्यासाठी कर्मचाऱ्याने कार्यालयाचा दरवाजा उघडताच सात ते आठ इसम आत शिरले व त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पंपावरील तीन कर्मचारी दरोडेखोरांसमोर हतबल ठरले व प्रतिकार करण्यास असमर्थ ठरले. दरोडेखोरांनी तिजोरीच्या चाव्या हिसकावून ४५ हजार रु पयांची रोकड पाच हजार रुपयांचे आॅईल व तीन भ्रमणध्वनी असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. लाकडी दांडके व नकली रिव्हॉल्व्हरचा वापर दरोडेखोरांकडून या घटनेत करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस निरीक्षक अनंत तारगे, किरण बैरागी, अशोक सूर्यवंशी, भोये व पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, सपोनि कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला त्यांनी भेट दिली. श्वान पथक, ठसेतज्ज्ञ याचे पथक पोहोचले; मात्र समाधानकारक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेले कैलास गायकवाड, जयवंत भोये, योगेश जोपळे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वणीत घरफोडीवणी : भरवस्तीतील किराणा दुकानातून मध्यरात्रीच्या सुमारास छताचा पत्रा उचकटून साठ हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याने घबराटीचे वातावरण आहे. संताजी चौक परिसरात कचरदास फत्तेचंद बागरेचा यांचे किराणा व भ्रमणध्वनी विक्र ीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री ते दुकान बंद करून घरी गेले. सकाळी ईश्वर बागरेचा यांनी दुकान उघडले असता दुकानातील ड्रॉवरमधील साठ हजार रुपये चोरीस गेल्याचे आढळून आले. (वार्ताहर)
वणी : ५५ हजार लुटले; तिघे जखमी
By admin | Updated: October 23, 2015 00:10 IST