लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्याचे काही वर्षांपूर्वीच विभाजन करून पोलीस प्रशासनाने आडगावसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती केली होती. आडगाव पोलीस ठाण्याला इमारत नसल्याने सुरुवातीला नवीन आडगाव नाक्यावरील श्री स्वामी नारायण पोलीस चौकीतच पोलीस ठाणे सुरू करण्यात आलेले होते, मात्र जागा अपुरी पडत असल्याने आडगाव शिवारातील बीएसएनएलच्या कार्यालयात पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आडगाव पोलीस ठाण्याचे काम बीएसएनएलच्या कार्यालयातच सुरू असून सध्या तेथील जागा अपुरी पडत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने अमृतधाम परिसरातील फ्लोरा हाइटसच्या मागे सुसज्ज जागा शोधून त्याठिकाणी जवळपास दोन कोटी रुपयांची नवीन आडगाव पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचे काम काही दिवसांपूर्वीच करण्यात आले आहे. सध्या पोलीस ठाण्याची इमारत पूर्ण झालेली असली तरी पोलीस ठाण्याचे स्थलांतर झालेले नसल्याने कर्मचाऱ्यांना नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीत स्थलांतराची प्रतीक्षा करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आलेले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते आडगावच्या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद््घाटन अपेक्षित होते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलीस ठाण्याच्या इमारत उद््घाटन कार्यक्रम नसल्याने सध्या तरी इमारत बांधून ती विनावापर पडूनच आहे. पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आडगाव पोलीस ठाण्यासाठी बांधलेल्या नवीन इमारतीत लवकरच पोलीस ठाणे स्थलांतर करण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी कुरबूरही सध्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांत सुरू आहे.
आडगाव पोलीस ठाण्याला स्थलांतराची प्रतीक्षा
By admin | Updated: June 19, 2017 19:06 IST