नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सात तहसीलदारांना सात दिवसांच्या आत आहे त्याच जागेवर पदस्थापना देण्याचे मॅटने दिलेल्या आदेशाची मुदत टळून दोन दिवसांचा कालावधी उलटला तरी शासनाकडून अद्यापही आदेश निघत नसल्याचे पाहून संयमाचा बांध सुटलेल्या तहसीलदारांनी नाशिक भेटीवर येऊ पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमक्ष कैफियत मांडण्याचा विचार चालविला आहे. १६ जून रोजी मॅटने याबाबतचा अंतिम आदेश जारी करून सात दिवसांत निलंबित सातही तहसीलदारांना पदस्थापना देण्यात यावी अशा सूचना केल्या होत्या, त्यामुळे तहसीलदारांच्या आशा पल्लवित होऊन शासन आदेशाकडे लक्ष लागून होते; परंतु मंगळवारी मॅटने दिलेल्या आदेशाची मुदत संपुष्टात आली, तत्पूर्वीच अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मॅट रद्द करण्याचा व तहसीलदारांच्या निलंबनाबाबत मॅटने दिलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचे विधान केल्यामुळे तहसीलदारांमध्ये चलबिचल निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या पदस्थापनेच्या आदेशाला खीळ बसल्याचे मानले जात आहे. मात्र मॅटने दिलेल्या आदेशाला अद्यापही शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिलेले नाही किंबहुना मॅटच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असताना त्यालाही दोन दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. प्राप्त परिस्थिती पाहता तहसीलदारांच्या पदस्थापनेला महसूल खात्याने हिरवा कंदील दर्शवून मुख्यमंत्र्यांकडे चेंडू टोलवला आहे, परंतु त्याचे पुढे काय झाले याचा उलगडा होत नसल्याने गेल्या महिन्यापासून नियुक्तीविना हवालदिल झालेल्या तहसीलदारांनी शनिवारी नाशिक भेटीवर येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराची कैफियत मांडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या संदर्भात दुजोरा मिळू शकला नाही.
तहसीलदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट पदस्थापनेची प्रतीक्षा :
By admin | Updated: June 26, 2015 01:26 IST